Header Ads Widget

Responsive Advertisement

मंदिरा विषयी माहिती

श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिरा विषयी माहिती

भौगोलिक स्थान:

अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या पुण्य नगरीतील पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सासवड पासून २५ किलोमीटर आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीखंडेरायाच्या जेजुरीपासून २२ किलोमीटर अंतरावर पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर 'वीर' ( ता. पुरंदर, जि. पुणे ) नावाचे गाव आहे. येथे पूर्णगंगेच्या उत्तर तीरावर श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे पवित्र देवस्थान आहे.

मंदिराची रचना :

वीर गावात सासवड वरून येताना मंदिर परिसरात श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराची कमान दिसते. कमानीतून आत आल्यावर समोरच रस्त्याच्या उजव्या दिशेला मंदिर नजरेस पडते. मंदिराच्या चहुबाजूने उंच असा चिरेबंदी तट असून पूर्व व दक्षिण अशी दोन महाद्वारे आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य दिमाखदार दरवाजावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आत प्रवेश केल्यावर समोरच राजिक देवी आहे. देऊळवाड्याच्या तटाच्या आतील बाजूने श्रीनाथांचे मानकरी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण, राऊत यांच्या ओवऱ्या आहेत. दसरा काळात नवसाचे उपवासकरी यांची राहण्याची सोय, भाविकांना छबिना, भाकणूक पाहणे, यात्रा काळात मानकरी यांच्या गाद्या, अन्नदान, गजे - गोपाळ जेवण व इतर मंदिरातील कार्यक्रमासाठी या ओवऱ्या आहेत.

गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना बाहेर देवाचे सेवक पहारेकरी ,कासव, देवाची घंटा, दरवाजातून प्रवेश केल्यावर पादुकामंदिर आणि श्रीनाथांचे वाहन (अश्व) घोडा आहे.

मुख्य मंदिर :

देऊळवाड्यात मुख्य मंदिर आणि राजिक देवी यांच्या दरम्यान भव्य दगडी कासव आहे. कासवावर देवापुढे उभे राहून भाविक भक्त नवस बोलतात. मंदिराच्या मुख्य द्वाराच्या पायरीवर बाहेरच्या बाजुला मोठा घंटा आहे. सदरेवरून गाभाऱ्यात प्रवेश करताना सभामंडपात डाव्या बाजुला श्रीनाथांचे वाहन अश्व आहे. याचे नाव ‘चिंतामणी’ असे आहे. आणि या अश्वासमोर ‘आदिशक्ती तुकाईदेवी’ ची महिषासूरमर्दिनी रूपातील काळ्या पाषाषाची अष्टभुजा मूर्ती आहे. तेथून आत गेल्यावर मुख्य गर्भगृहात श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि आई जोगेश्वरी यांच्या शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती आहेत. शेजारीच उजव्या बाजुला देवाचे शेजघर आहे. त्यामध्ये श्रीनाथांचा पलंग ठेवलेला आहे.

दर्शन व प्रदक्षणा :

दर्शन घेताना आधी प्रथम राजिक देवी, कासव, चिंतामणी अश्व, तुकाईदेवी, पादुका व नंतर गर्भगृहात श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी आईसाहेब यांचे दर्शन घेतल्यानंतर शेजघराजवळच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडून काळूबाई चे दर्शन घेतात.
मंदिराच्या मागच्या बाजूच्या त्रिमूर्तीचे दर्शन घेऊन गोमुख दर्शन करून पुढे स्वतः भोवती प्रदक्षणा घेतात पुढे मंदिराच्या समोरील उजव्या बाजूस मारुतीचे दर्शन घेऊन पुन्हा पादुकांचे दर्शन घेऊन कासवावर आल्यानंतरच श्रीनाथांच्या भोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

मंदिर व परिसर :

मंदिरामध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूला गुलाल - खोबऱ्याची दुकाने, दक्षिण द्वारावरील २ सिंह, भव्य प्रवेश द्वार , दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडल्यावर समोरच खळखळून वाहणारी पूर्णगंगा नदी मंदिराच्या सौंदर्यात भर पाडते.

"सवाई-सर्जा-म्हस्कोबानाथाचं-चांगभलं !!!"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या