भारतातील दुर्मिळ पूर्वाभिमुखी श्रीक्षेत्र वीरचा वीरेश्वर
श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वीर ही पुण्यभूमी आहे. वीर ही नगरी पुरंदरच्या गिरीशिखरावर उगम पावून नीरा नदीला मिळणाऱ्या पूर्णगंगेच्या तीरावर निसर्गरम्य वातावरणातील गाव आहे.
प्राचीन काळातील इतिहासाच्या काही खानाखुणा येथे जतन केलेल्या आहेत. येथील भूमीला पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या पदस्पर्शाने पावन केले आहे. श्रीनाथ महाराजांनी वीर क्षेत्री वास्तव्य केल्यामुळे श्रीक्षेत्र वीरला काशी क्षेत्राइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
फार वर्षांपूर्वी वीर प्रांत घनदाट दंडकारण्यात होता. शतकानूशतकांच्या धो-धो पावसामुळे हे अरण्य अधिक घोर झाले होते. दिवसाही अंधार वाटावा अशी किर्रर्र झाडे येथे होती. अगदी निर्मनुष्य असणारे हे अरण्य हिरवेगार रानवेली, राक्षसांसारखे प्रचंड वृक्ष अशा वातावरणात येते महाभयंकर असा वीरचुंड नावाचा राक्षस राहत होता. त्याचवेळी सीतामातेचे रावणाने अपहरण केले होते. प्रभू श्री रामचंद्र सीतामातेच्या शोधात दक्षिणेस चालले होते, वाटेत अनेक संकटे होती. अनेक राक्षसांना ठार करत प्रभू श्रीराम प्रवास करत या घनदाट अरण्यात आले. त्यांनी वीरचुंड राक्षसाचा वध करण्याचे ठरविले. या राक्षसाबरोबर श्रीरामांचे युद्ध सुरू झाले. घनघोर लढाई सुरूच होती. दिवस उतरणीला लागला, शेवटी प्रभू श्री रामचंद्रांनी वीरचुंड राक्षसास ठार केले. त्यावेळेस सूर्यास्त झाला होता. सूर्यास्तानंतर प्रभू श्रीराम प्रवास करीत नसल्याने त्यांनी याच ठिकाणी मुक्काम केला. भगवान शंकराच्या आराधनेने प्रभू श्रीराम दिन आरंभ करीत असल्यामुळे त्यांनी सूर्योदया बरोबर पूर्णगंगेचे स्नान केले आणि आपल्या हाताने पूर्वाभिमुख शिवलिंगाची स्थापना केली. हे पुरातन शिवलिंग म्हणजेच श्री वीरेश्वर महादेव याच देवावरून या गावास "वीर" हे नाव प्राप्त झाले.
श्री वीरेश्वराचे मंदिर अति प्राचीन असून संपूर्ण भारतात अशा पूर्वाभिमुख बारा पिंडी आहेत. त्यापैकी एक दुर्मिळ अशी ही वीरेश्वराची पूर्वाभिमुख पिंड येथे आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. शिवलिंगाची पूजा आरती करून भक्तगण येथे समाधान पावतात. मंदिरातील दीपमाळ सायंकाळी पेटविली जाते. श्रावण महिन्यात बाहेरून गावावरून येणाऱ्या भाविकांचे संख्या जास्त असते. शेवटच्या सोमवारी सर्व गावकरी मिळून भंडारा-अन्नदान करतात. अलीकडील काळात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी श्री गणेशाचे नूतन मंदिर व श्री वीरेश्वर उद्यान प्रकल्प प्रकल्प सुरू आहे निसर्गरम्य परिसरामुळे येथे एरवीदेखील भक्तांचे रीघ असते.

0 टिप्पण्या